आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने महाविकास आघाडीने तयारी सुरु केली आहे. जागावाटपाबाबत देखील महाविकास आघाडीच्या नेत्यांचा बैठकांचा सिलसिला सुरु आहे. महाविकास आघाडीचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण असेल?
याबाबत कोणतीही माहिती अद्याप समोर आलेली नाही. उद्धव ठाकरे यांनी स्वत: आधी मुख्यमंत्रिदाचा चेहरा ठरवा, असं जाहीर वक्तव्य महाविकास आघाडीच्या मेळाव्यात केलं होतं. मात्र महाविकास आघाडीकडून उद्धव ठाकरे यांच्या मागणीकडे सातत्याने दुर्लक्ष केले जात आहे.
महाविकास आघाडी मुख्यमंत्री पदाचा चेहरा देणार नाही, असे एका राष्ट्रवादीच्या नेत्याने म्हटले आहे. ठाकरे गटाच्या मागणीबाबत महाविकास आघाडीतील या ज्येष्ठ नेत्याने म्हटले की, आम्ही मुख्यमंत्री पदाचा चेहरा देणार नाही. महाविकास आघाडीत उद्धव ठाकरे यांच्या मागणीनुसार मुख्यमंत्री पदाचा चेहरा ठरवला जाणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी नवी दिल्लीत भेट घेवून काँग्रेस हायकमांडकडे आगामी विधानसभा निवडणुकीसाठी मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर करावा, अशी मागणी केली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. काँग्रेसच्या वरिष्ठ नेतृत्वाने ठाकरेंची ही मागणी नाकारली होती. महाराष्ट्रातील सत्ताधारी महायुतीला सत्तेतून खाली खेचावे. महाविकास आघाडीचे सरकार येईल अशी परिस्थिती निर्माण व्हावी. तसे झाल्यानंतर मुख्यमंत्रिपदाचा चेहरा निश्चित केला जावा, असे काँग्रेस हायकमांडने उद्धव ठाकरेंना सांगितले होते.
मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत असलेली नावे –
महाविकास आघाडीत मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत उद्धव ठाकरे, पृथ्वीराज चव्हाण, विजय वडेट्टीवार, नाना पटोले, बाळासाहेब थोरात, जयंत पाटील, सुप्रिया सुळे यांची नावे चर्चेत आहेत. या नेत्यांचे कार्यकर्ते याबाबत उघडपणे वक्तव्य करताना देखील दिसतात.
