ज्येष्ठ हवामान अभ्यासक माणिकराव खुळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यात उद्यापासून म्हणजे 28 सप्टेंबरपासून आठवडाभर म्हणजे शनिवार दिनांक 5 ऑक्टोबरपर्यंत खान्देश नाशिक नगर पुणे सातारा सांगली कोल्हापूर व सोलापूर व मराठवाड्यात अशा 18 जिल्ह्यात केवळ ढगाळ वातावरण राहून हळूहळू पावसाचा जोर काहीसा कमी होण्याची शक्यता. केवळ अगदीच तुरळक ठिकाणी किरकोळ पावसाची शक्यता आहे. तसेच मुंबईसह कोकण व विदर्भातील 18 जिल्ह्यात मात्र अशा प्रकारची उघडीपीची परिस्थिती ही 1 ते 5 ऑक्टोबर दरम्यानच्या पाच दिवसात जाणवू शकते.
मुंबई शहर व उपनगर, ठाणे व उपनगर, पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग अशा 7 जिल्ह्यात तर मध्य महाराष्ट्रातील नंदूरबार नाशिक पुणे सातारा सांगली कोल्हापूर अशा 6 जिल्ह्यात अशा एकूण 13 जिल्ह्यातील तापी, गोदावरी व कृष्णा नद्यांच्या खोऱ्यात मात्र पूर पाण्याची तीव्रता वाढू शकते, अशी माहिती माणिकराव खुळे यांनी दिली आहे.
दरम्यान, सहा ऑक्टोबरनंतर पुन्हा पावसाची सक्रियता वाढून 13 ऑक्टोबर पर्यंत म्हणजे आठवडाभर महाराष्ट्रात पुन्हा मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता जाणवत असल्याचे माणिकराव खुळे म्हणाले. ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यानंतर म्हणजे 16 ऑक्टोबरनंतर मान्सून केव्हाही निरोप घेऊ शकतो. अर्थात मान्सून निघून गेला तरी चक्रीवादळाचा सीझन चालु होत असल्यामुळे ऑक्टोबर महिन्याअखेर दरम्यानही महाराष्ट्रात पावसाची शक्यता नाकारता येत नसल्याचे खुळे म्हणाले.
