बाळासाहेब थोरातांसोबतच्या संघर्षाला शरद पवार जबाबदार, बड्या नेत्याचा आरोप 

विधानसभा निवडणुकीला अवघे काही दिवस बाकी असल्याने सत्ताधारी आणि विरोधक जोरदार प्रचार करताना दिसत आहेत. तर दुसरीकडे काही नेते मतदारांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी जुन्या गोष्टी उकरून काढत आरोप करताना दिसत आहेत.भाजपाचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी बाळासाहेब थोरात यांच्यासोबतच्या संघर्षाला शरद पवारांना जबाबदार धरलं आहे.

एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत बोलताना राधाकृष्ण विखे पाटील यांना काँग्रेसमधून बाहेर पडण्याचं कारण विचारण्यात आलं. यावर ते म्हणाले की, सुजय पाटीलच्या निवडणुकीवेळी त्यांना राष्ट्रवादीकडून उभे राहायला राहुल गांधी यांनी सांगितले होते. मात्र नगर दक्षिणची निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस सलग 3 वेळा हरली होती. त्यामुळे मी शरद पवारांना दोनदा भेटलो आणि त्यांना जागांची अदलाबदल करावी लागेल, असं म्हणालो. पण त्यांनी सांगितले की, माझे कार्यकर्ते ऐकत नाहीत.

त्यानंतर मी राहुल गांधींना भेटलो, तिथे मल्लिकार्जुन खर्गेही उपस्थित होते. मी त्यांना सुजय विखे राष्ट्रवादी काँग्रेसकडून का लढणार नाही याचे कारण सांगितले. तसेच शरद पवार मदत करणार नसतील तर पुढे काय करायंच? असा प्रश्नही मी त्यांच्यासमोर उपस्थित केला. त्यानंतर राहुल गांधींनी मला आणि सुजय विखेला पक्षाबाहेर ढकललं. म्हणून आम्ही भाजपात प्रवेश केला, असा गौप्यस्फोट राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला.

दरम्यान, बाळासाहेब थोरात यांच्यासोबतच्या संघर्षाबाबत प्रश्न विचारला असता राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की, भाऊसाहेब असेपर्यंत जिल्ह्यात संघर्षाची स्थिती नव्हती. मात्र त्यानंतर राजकीय स्थित्यंतरे झाली. काँग्रेसमधून राष्ट्रवादी काँग्रेस निर्माण झाली. खरं तर शरद पवारांचा राजकीय घडामोडींना हात होता. नगर जिल्ह्यात विखे पाटील आणि थोरात यांचा संघर्ष तीव्र करण्यात शरद पवारांचा हातभार लागला. त्यामुळे हे चित्र आज पाहायला मिळतंय.

पहिल्यापासून आमच्या वडिलांमध्ये आणि शरद पवारांमध्ये संघर्ष होता. जिल्ह्यात जोपर्यंत राजकीय अस्थिरता निर्माण करत नाही तोवर त्यांचेही राजकीय गणित साध्य होणार नव्हते. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व पक्षातील नेत्यांना आमच्या वडिलांविरोधात भूमिका घ्यायला शरद पवारांनी लावली. शरद पवारांच्या राजकारणाला बाळासाहेब बळी पडले. त्यातून संघर्ष आणखी वाढत गेला, असा गंभीर आरोपही राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला.

Leave a Comment