अमरावती : शरदचंद्र पवार गटाचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर दगडफेक झाल्याची घटना ताजी असताना अमरावतीमधून धक्कादायक बातमी समोर आली आहे. अमरावतीमध्ये भाजप आमदाराच्या बहिणीवर प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे. तर छत्रपती संभाजीनगरमध्येही अपक्ष उमेदवार हल्ला करण्यात आला आहे.
अमरावतीच्या धामणगाव रेल्वे विधानसभा मतदारसंघाचे भाजप आमदार प्रताप अडसड यांच्या बहिणीवर अज्ञातांनी हल्ला केल्याची घटना घडली आहे. सातेफळ फाट्यावरून जात असताना हल्लेखोरांनी गाडीवर हल्ला चढवला. या हल्ल्यात आमदार प्रताप अडसळ यांची बहीण अर्चना रोठे जखमी झाल्या आहे. त्यांच्या हातावर धारदार शस्त्राने वार करण्यात आले आहे. त्यांना तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. दरम्यान, कार्यकर्त्यांनी शांत राहण्याचं आवाहन आमदार प्रताप अडसड यांनी केलं आहे. चांदूर रेल्वे येथे त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी त्यांना अमरावती हलवण्यात आलं आहे. या प्रकरणाची पोलिसांनी दखल घेतली असून अधिक तपास करत आहे.
दरम्यान, अमरावतीमधील घटना ताजी असताना छत्रपती संभाजीनगरमध्ये देखील अपक्ष उमेदवाराच्या गाडीवर दगडफेक करण्यात आली आहे. गंगापूर विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार सुरेश सोनवणे यांच्या गाडीवर दगडफेक झाली आहे. या घटनेत सोनवणे जखमी झाले आहे. घटनास्थळी पोलीस दाखल झाले आहे. सोनवणे यांना तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहे.
भाजपच्या कार्यकर्त्यांनी शरद पवार गटाच्या उमेदवारीची स्कॉर्पिओ फोडली
दरम्यान, नाशिकमध्ये पुन्हा एकदा पूर्व विधानसभा मतदारसंघात राडा झाला आहे. भाजपचे राहुल ढिकले आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार गणेश गीते यांचा कार्यकर्त्यांमध्ये तुंबळ हाणामारी झाल्याची माहिती समोर आली आहे. राहुल ढिकले यांच्या कार्यकर्त्यांनी गणेश गीते यांच्या कार्यकर्त्यांची गाडी फोडली. गणेश गीते यांच्याकडून पैसे वाटप होत असल्याचा राहुल ढिकले यांच्या समर्थकांचा आरोप आहे. गणेश गीते यांच्या कार्यकर्त्यांकडून स्लीप वाटप केलं जात होतं. त्याचवेळी भाजपच्या कार्यकर्त्यांनी गणेश गीते यांच्या कार्यकर्त्यांची स्कॉर्पिओ गाडीची तोडफोड केली. या घटनेमुळे नाशिक शहरात तणावाचं वातावरण आहे. घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून तपास करत आहे.
