राज्यातील विधानसभा निवडणुकांचे निकाल नुकतेच लागले आहेत . त्यात महायुतीला पुन्हा एकदा सत्तेत बसण्याची संधी राज्यातील मतदार राजाने दिली आहे. मात्र आता निकालानंतर दूध संघाने दूध उत्पादकांना धक्का दिला आहे. कारण ‘गोकुळ’कडून गायीच्या दूध खरेदी दरात तब्बल 3 रुपयांची कपात करण्यात आली आहे.
गोकुळकडून दूध उत्पादकाकडून गायीच्या दुधाची 33 रुपयांनी खरेदी केली जात होती. आता गोकुळ गायीचे दूध प्रतिलीटर 30 रुपयांनी खरेदी करणार आहे. पश्चिम महाराष्ट्रातील सर्वच दूध संघांनी खरेदी दरात कपात केली आहे.
गोकुळकडून शेतकऱ्यांना धक्का
दरम्यान, पश्चिम महाराष्ट्रातील गोकुळ, वारणा, राजारामबापू या सहकारी संघासह पश्चिम महाराष्ट्रातील खासगी दूध संघांनी सुद्धा गाय दूध खरेदी दरात प्रतिलिटर तीन रुपयांची कपात केली आहे. 3.5 फॅट व 8.5 एसएनएफ दूध 30 रुपये लिटरने खरेदी केलं जाईल. थेट तीन रुपयांना कात्री लावल्याने दूध उत्पादक शेतकऱ्यांना तगडा झटका बसला आहे. गाय दूध पावडर, लोणी, दुधाचे बाजारातील विक्रीचे दर आणि खरेदी दर यामध्ये तफावत राहत आहे.
