मुंबई – शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीवरून शेतकरी नेते रविकांत तुपकर राज्यातील विविध जिल्ह्यांचा दौरा करत आहेत. लोकांनी लोकवर्गीतून दिलेल्या ‘लोकरथ’ नामक इनोव्हा गाडीतून लातूर येथील सभा आटोपून तुपकर निघाले असताना त्यांच्या गाडीचा वाशी टोलनाक्याजवळ अपघात झाला आहे.
मध्यरात्री १२.३० ते १ वाजेच्या दरम्यान वाशी तालुक्यातील पारगाव टोलनाक्यावर अपघाताची घटना घडली आहे. सुदैवाने या अपघात रविकांत तुपकर सुखरुप असल्याची माहिती आहे. त्यांना कोणतीही दुखापत झाली नसून, गाडीतील दोघांना किरकोळ दुखापत झाली आहे.
नुकतेच त्यांनी नाशिक परभणी, बीड येथील दौरे पूर्ण केले असून, ते लातूर जिल्ह्यातील तांदुळजा येथे कार्यकर्त्यांसोबत स्नेहभोजन घेतले. रात्री ११ वाजण्याच्या सुमारास ते जालन्याच्या दिशेने मार्गस्थ झाले. त्यांची गाडी वाशी तालुक्यातील पारगाव टोलनाक्यावर आली असताना अपघाताची घडना घडली.या अपघातामुळे संघटनेच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठी खळबळ उडाली होती. मात्र, तुपकर हे पूर्णतः सुरक्षित असल्याचे समजताच सर्व कार्यकर्त्यांनी सुटकेचा निश्वास घेतला.
नेमकी घटना कशी घडली?
पारगाव टोल नाक्यावर रविकांत तुपकर यांची गाडी थांबलेली असताना मागून भरधाव वेगाने आलेल्या साखरेने भरलेल्या ट्रकने त्यांच्या गाडीला जोरदार धडक दिली. या धडकेचा आवाज इतका जबरदस्त होता की स्फोट झाल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली. तर गाडीतील मागील सीटवर बसलेले लोक समोर फेकले गेले. धडक देणारा ट्रकचालक हा मद्यधुंद अवस्थेत होता, अशी माहिती आहे.
मात्र, अपघातात रविकांत तुपकर यांना कोणतीही दुखापत झाली नाही. त्यांचे पीए कार्तिक सवडतकर आणि राजाराम जाधव यांना सौम्य मार लागला आहे. तर चालक अजय मालगे व तुपकरांचे सहकारी गजानन नाईकवाडे यांना कोणतीही दुखापत नाही. धडक देणारा ट्रकचालक संभाजी डोंगरे (पंढरपूर) याच्यावर वाशी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.
