पारनेर(DSNews24/किरण पुरी) गेल्या काही वर्षांपासून शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी लढणाऱ्या भूमिपुत्र शेतकरी संघटनेची राज्यात एक वेगळी ओळख आहे. संस्थापक संतोष वाडेकर यांच्या नेतृत्वाखाली भूमिपुत्र शेतकरी संघटनेने अनेक आंदोलने केली.
तसेच अहिल्यानगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्याचा गेली अनेक वर्ष न सुटलेल्या पाणी प्रश्नांवर भूमिपुत्र शेतकरी संघटनेने शासनदरबारी आवाज उठवला. त्यात या संघटनेला काही प्रमाणात यश देखील मिळाले. त्यातच कर्जमाफी, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अशा विविध विषयांवर पारनेर येथील शासकीय विश्रामगृहात नुकतीच संस्थापक संतोष वाडेकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली.
या बैठकीला अशोक आंधळे, संतोष वाबळे, बाळशिराम पायमोडे, किरण वाबळे, मनोज तामखडे, सुभाष पाटील करंजुले, रावसाहेब झांबरे, अन्सार पटेल, नंदू साळवे, अरुण बेलकर, बाळासाहेब वाळुंज, अनिल सोबले, वसंत साठे, राहुल गुंड, रघुनाथ मांडगे, प्रवीण खोडदे उपस्थित होते.
यावेळी बैठकीत आगामी काळात जिल्हा परिषद निवडणुकीत पुर्ण ताकदीने उतरायचे ठरविले. त्यामुळे आता पारनेर तालुक्यातील पाच जिल्हा परिषद गटात व दहा गणात भूमिपुत्र शेतकरी संघटना उमेदवार उतरविणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. तसेच आतापासूनच भूमिपुत्र शेतकरी संघटना कामाला लागली असून आगामी काळात नेमके काय घडामोडी घडणार हे त्याचवेळी दिसून येणार आहे.
