नगर ब्रेकिंग! झेडपी निवडणूकीसाठी आरक्षण सोडत कार्यक्रम सोमवारी जाहीर होणार…

अहिल्यानगर – जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी येत्या सोमवार (दि.२५) रोजी आरक्षण कार्यक्रम होण्याची शक्यता आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या सुचनेनूसार जिल्हा प्रशासन जिल्हा परिषदेच्या ७५ गट आणि पंचायत समितीच्या १५० गणांचे प्रारूप आरक्षण जाहीर करण्यात येणार असून या प्रारूप आरक्षणावर हरकती आणि सुनावणी होवून त्यानंतर विभागीय आयुक्तांच्या मान्यतेने आरक्षण अंतिम होणार आहे.

यासाठी प्रभाग रचनेनूसार स्वतंत्र कार्यक्रम राहणार असल्याचे निवडणूक विभागाच्या सुत्रांकडून सांगण्यात आले. दरम्यान, यापूर्वी जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठी २०१७ मध्ये निवडणूक झाल्या होत्या. त्याची मुदत २०२२ मध्ये संपल्यानंतर तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने वाढीव ओबीसी आरक्षणानूसार गट आणि गणांचे आरक्षण जाहीर केले होते.

मात्र, हे प्रकरण न्यायालयात गेल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने ओबीसीचे वाढीव आरक्षण रद्द करत २०१७ च्या २७ टक्के ओबीसी आरक्षणानूसार निवडणूक घेण्याचे आदेश दिले. त्यानूसार आता राज्य निवडणूक आयोगाच्या सुचनेनूसार जिल्हा प्रशासन गट आणि गणांची राजकीय आरक्षण जाहीर करणार आहेत.

दरम्यान, यंदा जिल्ह्यात कर्जत आणि जामखेड तालुक्यात प्रत्येकी एक यानूसार जिल्हा परिषदेचे दोन आणि पंचायत समितीचे चार गण वाढलेले असून याचा परिणाम जिल्हा आरक्षणावर होण्याची शक्यता आहे. एकाचा खो दुसऱ्याला बसल्याने जिल्ह्यातील सर्व गटातील आरक्षण बदलण्याची शक्यता आहे. जिल्हा प्रशासनाकडून प्रारूप आरक्षण जाहीर झाल्यावरच प्रत्येक गटातील राजकीय परिस्थितीचा अंदाज येणार आहे. तोपर्यंत इच्छुकांकडून आराखडे बांधण्यास सुरूवात झाल्याचे सांगण्यात आले.

दरम्यान, जिल्हा परिषद गटाचे आरक्षण काय निघणार, आपला हक्काचा गट खुला राहणार की आरक्षीत होणार? त्यातही सर्वसाधारण की महिलेसाठी राहणार याकडे जिल्ह्यातील इच्छुकांचे लक्ष राहणार आहे.

Leave a Comment