मुंबई – राधाकृष्ण विखे पाटलांना मुख्यमंत्री होण्याची महत्वाकांक्षा असल्याचा दावा ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी झी २४ तासच्या ‘टू द पॉईंट’ या विशेष कार्यक्रमात केला आहे.
मुंबईत आलेल्या मराठा झुंडीपुढे सरकार अगतिक होतं. अशामध्ये आपण मराठा समाजाचा आवाज होण्याचा प्रयत्न राधाकृष्ण विखे पाटील करत होते असाही दावा लक्ष्मण हाकेंनी केला आहे. मात्र गेल्या काही पिढ्या कारखानदारी केलेल्या विखेंना सामाजिक न्याय काय कळतो? असा सवाल हाकेंनी केला आहे.
राधाकृष्ण विखे पाटील यांनी आधी सरकारचा प्रतिनिधी म्हणून जाऊन भेटणं आणि नंतर वेगळं जाऊन भेटणं यावर काहींनी आक्षेप घेतल्यासंदर्भात विचारलं असता लक्ष्मण हाकेंनी उत्तर दिलं की, “झुंडीपुढे सरकार आगतिक होतं. आणि विखे पाटलांना महाराष्ट्राचा मुख्यमंत्री व्हावं असं वाटत आहे. मग मराठा इतका त्वेषाने इथे आला असताना मी मराठा समाजासाठी काहीतरी करतोय, मला मसिहा होता येतंय का? किंवा यांचा आवाज होता येतंय का? हे लटके प्रयत्न आहेत”.
विखे पाटलांना मुख्यमंत्री होण्याच्या दाव्यासंदर्भात विचारलं असता ते म्हणाले, “मी सामान्य माणसाची भाषा बोलत आहे. मला कोणाची भीती ठेवण्याचं कारण नाही. तुमची पाचवी पिढी राजकारणात आहे, तुम्ही कारखानदारीशिवाय दुसरं काही केलं नाही. त्यांना सामाजिक न्याय काय कळतो? मी फार जबाबदारीने बोलत आहे. कोण हाके, त्याचा काय संबंध? अशी विचारणा त्यांनी केली होती”.
