रऊफ शेख यांची ‘ती’ मागणी अन् आमदार अमोल खताळ यांनी घेतली तातडीने दखल

संगमनेर (DSNews24 /किरण पुरी) तालुक्यातील मांडवे बुद्रुक ते साकूर फाटा या रस्त्याच्या अनेक ठिकाणी साईडपट्ट्याची अत्यंत दयनीय अवस्था झाल्याने वाहतुकीला मोठी अडचण निर्माण होत आहे. याबाबत भाजपा अल्पसंख्यांक मोर्चाचे जिल्हाध्यक्ष रऊफ शेख यांनी आमदार अमोल खताळ पाटील यांचेकडे साईडपट्ट्याची दुरूस्ती व्हावी या मागणीसाठी लेखी निवेदनाद्वारे मागणी केली होती.

या मागणीची आमदार अमोल खताळ यांनी तातडीने दखल घेत त्यांनी तात्काळ कार्यकारी अभियंता,सावर्जनिक बांधकाम विभाग,संगमनेर यांना कार्यवाही करण्याच्या सुचना केल्या होत्या. त्यानंतर कार्यकारी अभियंता श्री.मिसाळ यांनी मांडवे बु ते साकूरफाटा या रस्त्यांची साईडपट्ट्यांची दुरुस्ती दिवाळीनंतर लगेचच करणार असल्याचे आश्वासन रऊफ शेख यांना दिले असून त्यासाठी आर्थिक तरतुद देखील करण्यात आली आहे. त्यामुळे साईटपट्ट्यांची लवकरच दुरूस्ती होणार आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून साकूर ते मांडवे या रस्त्यावर वाहतुक मोठ्या प्रमाणावर वाढली असुन साईडपट्ट्या नसल्याने रस्ता अरुंद झाला आहे. या दयनीय अवस्थेमुळे रस्त्यावरुन दोन मोठी वाहने पास होण्यास अडथळा निर्माण होत आहे. तसेच वाहन रस्त्यावरुन खाली उतरवताना साईडपट्टीच नसल्याने डांबरी रस्त्यालगत कपार निर्माण झाल्याने धोक्याचे झाले आहे.

तसेच दुचाकीस्वारांना देखील वाहन चालवताना कसरत करत वाहन चालवावे लागत आहे. अनेक अपघात देखील घडत आहे. या महत्त्वाच्या विषयावर भाजपा अल्पसंख्यांक मोर्चाचे जिल्हाध्यक्ष रऊफ शेख यांनी आमदार अमोल खताळ पाटील यांना लेखी निवेदन देण्यात आले होते. त्यानंतर आता हा प्रश्न लवकरच मार्गी लागणार आहे.

Leave a Comment