मोठी बातमी! अन् मुख्यमंत्र्यांचे हेलिकॉप्टर हवेतच गायब, नेमकं काय घडलं?

कर्नाटकचे मुख्यमंत्री सिध्दरामय्या यांच्याबाबत एक क्षणभर काळजाचा ठोका चुकवणारी घटना घडली. रायचूर जिल्ह्यात लिंगसुगूर येथे कार्यक्रमासाठी येणाऱ्या सिध्दरामय्यांचे हेलिकॉप्टर ठरलेल्या हेलिपॅडवर न उतरता हवेतच घिरट्या घालून अचानक गायब झाल्याने प्रशासन आणि सुरक्षायंत्रणांमध्ये एकच खळबळ उडाली.

नेमकं काय घडलं?

मुख्यमंत्री सिध्दरामय्या हे माजी मंत्री अमरगौडा पाटील बय्यापूर यांच्या नातवाच्या विवाह सोहळ्यासाठी लिंगसुगूर येथे येणार होते. या पार्श्वभूमीवर रायचूर येथे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि मंत्र्यांसाठी विशेष हेलिपॅड तयार करण्यात आला होता. हायप्रोफाईल सुरक्षेसह सर्व तयारी पूर्ण करण्यात आली होती.

नियोजित वेळेनुसार मुख्यमंत्र्यांचे हेलिकॉप्टर हेलिपॅडच्या दिशेने येतानाही दिसले. मात्र काही वेळ ते हवेतच घिरट्या घालत राहिले आणि अचानक दृष्टीआड झाले. त्यामुळे हेलिपॅडवर उपस्थित अधिकारी आणि सुरक्षा यंत्रणांचा काळजाचा ठोका चुकला. नेमके काय घडले, याबाबत काही क्षण कोणालाही माहिती मिळू शकली नाही.

अखेर काही मिनिटांनंतर मुख्यमंत्र्यांचे हेलिकॉप्टर जवळच्या दुसऱ्या हेलिपॅडवर उतरणार असल्याची माहिती देण्यात आली. विशेष म्हणजे हा हेलिपॅड भाजपच्या एका आमदाराचा खासगी हेलिपॅड असल्याचे समोर आले. ठरलेल्या हेलिपॅडवर आधीच उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांचे हेलिकॉप्टर उभे असल्याने सिध्दरामय्या यांच्या हेलिकॉप्टरच्या पायलटला ऐनवेळी हा बदल करावा लागला.

ही माहिती मिळताच पोलिस आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांची चांगलीच धावपळ उडाली. संपूर्ण ताफा तातडीने त्या खासगी हेलिपॅडकडे रवाना झाला. मात्र या ठिकाणी कोणतीही पूर्वतयारी किंवा सुरक्षाव्यवस्था नसल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

या घटनेमुळे प्रशासन आणि पोलिस यंत्रणेतील समन्वयाच्या अभावाचे चित्र समोर आले आहे. आधीच उपमुख्यमंत्र्यांचे हेलिकॉप्टर हेलिपॅडवर असताना त्याची माहिती मुख्यमंत्र्यांच्या पायलटला का देण्यात आली नाही, दोन्ही नेत्यांच्या वेळांचे योग्य नियोजन झाले होते का, तसेच सुरक्षेबाबत निष्काळजीपणा झाला का, असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.

Leave a Comment