युद्धाचा परिणाम, पेट्रोल – डिझेल महागणार…

आखाती देशांमध्ये भडकलेल्या युद्धाच्या आगीची झळ जगाला बसू लागली आहे. अमेरिका, इस्रायलने केलेल्या हल्ल्यानंतर इराणने होर्मुझची सामुद्रधुनी बंद केली आहे.

होर्मुझची सामुद्रधुनी ही महत्त्वाच्या जलमार्गापैकी एक आहे. सुरक्षेच्या कारणास्तव हा निर्णय घेतल्यानं जागतिक सागरी व्यापारावर प्रचंड परिणाम होण्याची शक्यता आहे. इस्रायल इराण युद्धानंतर कच्च्या तेलाच्या किंमतीतही मोठी वाढ झाली आहे. यामुळे नवं संकट निर्माण झालं आहे. इराणने आखाती देशांवर क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ले केले आहेत. यात दुबई, अबुधाबीसह कतार, बहरीन, सौदी अरेबिया आणि ओमानचा समावेश आहे.

इस्रायल इराणच्या युद्धाचा परिणाम इंधन तेलाच्या दरावर दिसून येत आहे. कच्च्या तेलाच्या किंमती शुक्रवारी ७२ डॉलर प्रति बॅरल इतक्या होत्या. गेल्या सात महिन्यात हा उच्चांकी दर होता. तर २०२६ च्या पहिल्या दोन महिन्यातच यात १९ टक्के वाढ झाली होती. पण आता दोन दिवसात यात तब्बल १२ टक्क्यांनी वाढ होऊन कच्च्या तेलाच्या बॅरलचा दर ८० डॉलरच्या वर पोहोचला आहे. यामुळे जगभरात इंधन तेलाच्या किंमती वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

अमेरिकन वेस्ट टेक्सास इंटरमीडिएटमध्येही ८ टक्के वाढ झाली आहे. या तेलाचे दर ७० डॉलर प्रति बॅरलच्या वर पोहोचले आहेत. इस्रायलकडून इराणवर याआधीही १२ दिवस हल्ले करण्यात आले होते. त्यावेळी कच्च्या तेलाचे दर वाढले होते. त्यानंतर आता पहिल्यांदा ८० डॉलरच्या वर तेलाचे दर गेले आहेत.

तेलाच्या क्षेत्रात इराणची मक्तेदारी कमी झाली असली तरी ओपेक आणि इतर आघाडीतील तो सर्वात मोठा चौथा उत्पादक देश आहे. सौदी अरेबियाच्या नेतृत्वाखालील गटात एकूण उत्पादनात इराणचा वाटा १२ टक्के इतका आहे. इराण दरदिवशी ३.३ मिलियन बॅरेल तेल काढू शकते. जागतिक एकूण उत्पादनाच्या तुलनेत हे प्रमाण ३ टक्के इतकं आहे. देशातील सर्वात मोठी रिफायनरीची क्षमता ही ५ लाख बॅरल प्रतिदिन इतकी आहे.

Leave a Comment