BREKING! महाराष्ट्रातील राजकीय भूकंपानंतर आता विरोधी पक्षनेते पदासाठी बाळासाहेब थोरात…..

राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी आज राज्याच्या उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. राजभवनातील दरबार हॉलमध्ये आज उपमुख्यमंत्रिपदाचा शपथविधी सोहळा पार पडला आहे. आज अजित पवारांनी विरोधी पक्ष नेत्याचा राजीनामा देत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे.

त्यानंतर आता राज्याचे विरोधी पक्षनेते पद काँग्रेसकडे आले आहे. अजित पवार यांच्या शपथविधीमुळे राज्यात नवीन राजकीय समीकरण तयार झाले आहे. राज्यात राष्ट्रवादी, शिंदे गट आणि भाजपची युती झाली आहे. अजित पवार सरकारमध्ये सामील झाल्यानंतर महायुतीचं बळ आणखी वाढलं आहे.

विरोधी पक्षनेतेपद कुणाकडे जाणार?

राष्ट्रवादीतील 35 आमदारांचा जर अजित पवार यांना पाठिंबा दिला आणि राष्ट्रवादीत फुट पडली तर विरोधी पक्षनेतेपद देखील राष्ट्रवादीकडून जाण्याची शक्यता आहे. कारण राष्ट्रवादीचे विधानसभेत 54 आमदार आहेत. त्यापैकी 35 आमदार अजित दादांसोबत गेल्यास उर्वरित 19 आमदार शरद पवार यांच्यासोबत आहेत असे चित्र आहे. दुसरीकडे ठाकरे गटाकडे विधानसभेत 16 आमदार आहेत, तर काँग्रेसकडे 44 आमदार आहे.

विरोधी पक्षनेतेपदासाठी ही 3 नावं चर्चेत

विधानसभेतील सध्याचं संख्याबळ पाहिल्यास काँग्रेसकडे सर्वाधिक आमदार आहेत. त्यामुळे विरोधी पक्षनेतेपद देखील काँग्रेसकडे जाण्याची शक्यता आहे. राजकीय वर्तुळात विरोधी पक्षनेतेपदासाठी काँग्रेसमधील तीन नेत्यांच्या नावांची चर्चा सुरू झाली आहे. यात जेष्ठ नेते बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि नाना पटोले यांच्या नावांची चर्चा सुरू झाली आहे.

Leave a Comment