Onion : भुमिपूत्र कांदा प्रश्नावर आक्रमक ; आज कांद्याची होळी करत सरकारचा निषेध करणार

अहमदनगर : कांद्याला प्रति क्विंटल ६०० रूपये मदत व उत्पादनखर्चावर आधारित हमी भाव देण्याची मागणीसाठी भुमिपूत्र शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे. तसेच राज्य व केंद्र सरकारचे शेतकऱ्याकडे पुर्णपणे दुर्लक्ष असल्याने कांद्याचे भाव घसरले आहे. कवडीमोल भावाने कांदा(onion) विक्री करण्याची वेळ आली असल्याने आज सोमवार ६ तारखेला कांद्याची होळी करत राज्य व केंद्र सरकारचा निषेध करण्याचा इशारा भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे संस्थापक संतोष वाडेकर यांनी दिला आहे. तसेच शेतकऱ्यांनी गावोगावी या कांद्याची होळी करत सरकारचा निषेध करण्याचे आवाहन संतोष वाडेकर यांनी केले आहे

श्री वाडेकर पुढे बोलताना म्हणाले की, कांदा दरवाढीनंतर एका रात्रीत कांदा निर्यातबंदी करून परदेशातून कांदा मागवणारे सरकार गेल्या दोन-तीन महिन्यांपासून कांद्याचे दर कवडीमोल झाले असतानाही कांद्याची दर घसरण थांबविण्यासाठी कुठल्याही प्रकारच्या ठोस उपाययोजना केल्या नाहीत. कारण राज्य व केंद्र सरकार शेतकऱ्यांचा बाजूचे नसल्याचे दिसून येत आहे. तसेच शेतकरी कष्टाने कांदा व इतर पिके पिकवत असतो. परंतु भावच मिळत नसल्याने शेतकरी मेटाकुटीला आला आहे.

तसेच सद्यस्थितीत कांदा उत्पादक शेतकऱ्यांवर संकट आले आहे. त्यामुळे राज्य व केंद्र सरकारने तातडीने कांद्याला प्रति क्विंटल ६०० रूपये मदत व उत्पादनखर्चावर आधारित हमी भाव जाहीर करावा. तसेच या मागण्या मान्य न केल्यास आगामी काळात संपूर्ण महाराष्ट्रात आंदोलन करण्यात येईल असे संतोष वाडेकर म्हणाले…

Leave a Comment