नाशिकच्या लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने आज सायंकाळी धडाकेबाज कामगिरी करीत नाशिकचे तहसीलदार यांना तब्बल 15 लाख रुपयांची लाच घेताना ताब्यात घेतले आहे. ही कारवाई अधीक्षिका शर्मिष्ठा वालावलकर यांच्या नेतृत्वाखाली झाली. यामुळे महसूल विभागात मोठी खळबळ उडाली आहे. तक्रारदार हे 52 वर्षीय वृद्ध आहे.
नरेशकुमार तुकाराम बहिरम (वय ४४, हुद्दा तहसीलदार नाशिक, रा. फ्लॅट नंबर ६०४, बी विंग, मेरिडियन गोल्ड, कर्मयोगी नगर, नाशिक) असे लाचखोर तहसीलदाराचे नाव आहे. नाशिक तालुक्यातील राजुर बहुला येथील जमिनीच्या मालक यांच्या जमिनीमध्ये मुरुम उत्खनना बाबत मूल्य नियमानुसार पाचपट दंड, स्वामित्वधन जागा भाडे मिळून एकूण रक्कम १,२५,०६,२२० रूपये याप्रमाणे दंड आकारणी बाबत बहिरम यांच्या कार्यालयाकडून आदेश आले होते. त्या आदेशाविरुद्ध जमिनी मालक यांनी उपविभागीय अधिकारी नाशिक यांच्याकडे अपील दाखल केले होते
त्याबाबत आदेश होऊन या प्रकरणाची पुन्हा फेर चौकशीसाठी नरेशकुमार बहिरम (तहसीलदार नाशिक) यांच्याकडे पाठवण्यात आले होते. या मिळकती मधील उत्खनन केलेला मुरूम त्याच जागेत वापर वापर झाल्याचे जमिनी मालक यांनी त्यांच्या जबाबात नमूद केले होते. याबाबत पडताळणी करण्यासाठी लाचखोर तहसीलदार बहिरम यांनी जमिनी मालक यांना त्यांच्या मालकीच्या राजुर बहुला तालुका जिल्हा नाशिक येथे स्थळ निरीक्षण वेळी बोलावले होते.
परंतु जमिनीच्या मालक या वयोवृद्ध व आजारी असल्याने त्यांनी यातील तक्रारदार यांना त्यांच्या वतीने कायदेशीर कारवाईसाठी अधिकार पत्र दिल्याने ते लाचखोर यांना स्थळ निरीक्षण वेळी भेटले असता त्यांनी तक्रारदार यांच्याकडे 15 लाख रुपये लाचेची मागणी केली व ही लाच मागणी केल्याचे पडताळणी पंचनामा वेळी मान्य करून लाच स्वीकारण्याचे मान्य केले. व मागणी केलेली लाचेची रक्कम आज (दि.5) रोजी लाच स्वीकारली.
