संगमनेर (DSNews24/किरण पुरी) तालुक्यातील साकूर जवळील बिरेवाडी येथील गावठाण जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या प्रांगणात गेल्या आठ दिवसांपासून सुरू असलेला सराव करून १५ ऑगस्ट दिनाचे औचित्य साधून शालेय विद्यार्थ्यांनी ढोला ’च्या तालावर लेझीमची नृत्य संचलन नेत्रदीपक सादर केली.
विद्यार्थ्यांच्या आकर्षक, मनमोहक अन् चपळ हालचालींमधून लेझीमचा साज चढविला. यावेळी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरून उत्साह ओसंडून वाहत होता. देशाचा ७७ वा स्वातंत्र्यदिन सर्वत्र उत्साहात साजरा करण्यात आला. तसेच विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.
दरम्यान, साकूर जवळील बिरेवाडी येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी विद्यार्थी पारंपरिक वेशभूषेत आले होते. कार्यक्रमाच्या प्रारंभीच विद्यार्थ्यांनी गेल्या आठ दिवसांपासून तयारी केलेल्या लेझीमच संचलन सादर करून साऱ्यांचे लक्ष वेधून घेतले होते.
विद्यार्थी लेझीमच्या समूहनृत्य तालासुरात लयबद्ध मागे-पुढे करीत होते. नृत्याची प्रत्येक हालचाल लेझीमच्या ठेक्याशी व नादलयींशी सुसंगतरीत्या केली जात होती. पारंपरिक वेशभूषांत विद्यार्थी अधिकच खुलून दिसत होते.
यात अगदी लेझीम खेळताना स्वस्तिक, दिवा, कमळाचे फूल, विविध कृतीतून कला सादर केली. या सर्व कला मोबाईलमध्ये टिपण्यासाठी पालकांचीही गर्दी झाली होती. लेझीम खेळणाऱ्या विद्यार्थी वाजवीत असलेल्या ढोल- ताशांचा गजराने वातावरणात तसेच बघणाऱ्यांनाही उत्साह निर्माण झाला होता.
