अखेर साकूर ग्रामपंचायतीचे सदस्य सुनिल भुजबळ यांचे आमरण उपोषण सुरू 

संगमनेर(DSNews24/किरण पुरी) एकीकडे देशभरात स्वातंत्र्य दिन उत्साह साजरा केला जात असताना संगमनेर तालुक्यातील साकूर येथील ग्रामपंचायतीचे सदस्य सुनिल निवृत्ती भुजबळ यांनी १४ ऑगस्ट २०२३ पर्यंत घारगाव पोलिसांनी पीक अप शोधून न दिल्यास १५ ऑगस्ट २०२३ पासून संगमनेर पोलिस उपविभागीय कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसणार असल्याचा इशारा दिला होता.

मात्र चोरी गेलेल्या पीक अप वाहनाचा अद्यापही घारगाव पोलिसांना शोधच न लागल्याने अखेर सुनिल भुजबळ यांनी आज सकाळी ११ वाजता आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे. जोपर्यंत पीक अपचा शोध लागत नाही तोपर्यंत आमरण उपोषण सुरूच ठेवणार असल्याचे उपोषणकर्ते सुनिल भुजबळ यांनी म्हटले आहे. दरम्यान उपोषण स्थळी संगमनेर पोलिस उपविभागीय अधिकारी सोमनाथ वाकचौरे यांनी देखील भेट दिलीय.

याबाबतचे पत्रव्यवहार या आधी सुनिल भुजबळ यांनी पोलिस उपविभागीय अधिकारी यांच्या सह संबंधितांना दिले आहे. पत्रात म्हटले आहे की, साकूर येथील भुजबळ वस्तीवर माझ्या कुटुंबासोबत राहत असून शेती व्यवसाय करून कुटुंबांचा उदरनिर्वाह करतो. शेतीच्या कामासाठी सन २०१३ साली जुनी महिंद्रा बोलेरो पीक अप (नं. एम एच 43 ए. डी. 5367) घेतली होती. पीक अपचा वापर घरगुती शेतीचा माल व शेतकऱ्यांचा शेत माल वाहतूकीसाठी करत होतो.

दरम्यान १९ जुलै २०२३ रोजी रात्रीच्या वेळी पीक अप अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली. याबाबत घारगाव पोलीस स्टेशनला तक्रार देखील केली आहे. तसेच अज्ञात चोरट्यांनी पीक अप चोरून नेल्याचे साकूर पासून ते श्रीरामपूर पर्यंत रस्त्याच्या लगत असलेल्या विविध ठिकाणी असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दिसत आहे. सर्व घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद असताना देखील घारगाव पोलिसांनी पीक अपचा शोध लावला नाही. १० लाख रुपये किंमतीची पीक अप चोरीला गेल्याने माझी मनस्थिती ढासळत चालली आहे.

घारगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक व तपासी पोलिस कर्मचाऱ्यांनी या घटनेकडे पुर्णपणे दुर्लक्ष केले आहे. श्रीरामपूर पर्यंत सीसीटीव्ही कॅमेऱ्यात पीक अप चोरून नेल्याचे दिसत असताना देखील पोलिसांनी शोध का लावला नाही हाच प्रश्न आहे. असे दिलेल्या पत्रात म्हटले आहे.

Leave a Comment