माजी मंत्री बबनराव पाचपुते यांच्या पुतण्याचा ठाकरे गटात प्रवेश

माजी मंत्री बबनराव पाचपुते यांचे पुतणे साजन पाचपुते यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला आहे. मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश झाला आहे.

मागील ग्रामपंचायत निवडणुकीत साजन यांनी काकांना सोडून राजकारण करत सरपंचपद मिळविले होते. साजन सातपुते यांनी काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. त्यामुळे ते शिंदे गटात जाणार असल्याची चर्चा सुरू झाली असतानाच पाचपुते यांनी ठाकरे गटाची निवड केली. या पक्षप्रवेशामुळे ठाकरे गटाची नगर जिल्ह्यात ताकद वाढली आहे.

काही महिन्यांपूर्वी पार पडलेल्या नगर जिल्ह्यातील काष्टी गावच्या सरपंचपदाच्या निवडणुकीत साजन यांनी बबनराव पाचपुते यांचे पुत्र प्रतापसिंह यांचा पराभव केला होता. साजन यांनी बहुमताने विजय मिळवत राजकारणात स्वतंत्रपणे प्रवेश केला.

त्यानंतर साजन पाचपुते यांनी श्रीगोंदा कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूकही आमदार पाचपुते यांच्या गटाविरुध्द लढवून जिंकली. गावचे सरपंच व बाजार समितीचे संचालक ही पदे असतानाही राजकीयदृष्ट्या साजन पाचपुते कुठल्याही पक्षात नव्हते.

अशातच शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांच्या माध्यमातून पाचपुते यांची मुंबईत पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी भेट झाली होती. त्यानंतर आज त्यांचा पक्षप्रवेश झाला आहे.

Leave a Comment