जून ते सप्टेंबर असे वर्षातील चार महिने भारतात मुक्काम केल्यानंतर आज पासून मॉन्सूनचा परतीचा प्रवास सुरु झालेला आहे. राजस्थानमधून मॉन्सूनने परतीचा प्रवास सुरु केल्याचे हवामान खात्याने जाहीर केले आहे.
तर येत्या काहीच दिवसात महाराष्ट्रातून देखील यंदाच्या वर्षीचा मान्सून निरोप घेईल.
यंदाचा पावसाळा हा देशातील काही राज्यांसाठी सुखावणारा तर काही राज्यांसाठी कोरडा ठरला. यंदा भारतातील उत्तराखंड, दिल्ली, आसाम, नागपूर या सारख्या ठिकाणी पावसाने दमदार हजेरी लावल्याने येथे पूरस्थिती निर्माण झाली होती. मात्र काही ठिकाणी यंदा पुरेसा पाऊस पडलेला नाही. हवामान खात्याच्या सांगण्यानुसार, यंदा देशात सरासरीच्या 94 टक्के तर राज्यात सरासरीच्या 3 टक्के कमी पाऊस पडला आहे. तर महाराष्ट्रातील 9 जिल्ह्यात माञ, मान्सून आपली सरासरीही गाठू शकला नाही. यावर्षी सर्वात कमी पाऊस हा सांगली, सातारा, सोलापूर या तीन जिल्ह्यात पडलाय.
जून, जुलै महिन्यात देशासह राज्यात पावसाने चांगली हजेरी लावली परंतु ऑगस्ट महिना मात्र बऱ्याच ठिकाणी कोरडा ठाक गेला. मात्र पावसाने जाता जाता सप्टेंबर महिन्यात तो बँकलॉक काही प्रमाणात का होईना काढल्याचे पाहायला मिळाले.
30 सप्टेंबर पासून देशातील मान्सूनचा परतीचा प्रवास सुरु झाला असला तरी महाराष्ट्रातून 5 ऑक्टोबरला मान्सून निरोप घेणार असल्याचे हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे. तर संपूर्ण देशातून 15 ऑक्टोबर ला मान्सून संपूर्णत: माघारी फिरेल असे हवामान खात्याचे म्हणणे आहे.
