मनोज जरांगे पाटील मध्यरात्री रूग्णालयात येताच…..

मनोज जरांगे पाटील हे आरक्षणाच्या मुद्दयावरून अधिकच आक्रमक झाले आहेत. जालन्यातील सभा प्रचंड यशस्वी झाल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी आता थेट प्रस्थापितांवर हल्ला करण्यास सुरुवात केली आहे.

प्रस्थापितांमुळेच आम्हाला आरक्षण मिळालं नाही. प्रस्थापितांनी मनावर घेतलं तर आम्हाला दोन तासात आरक्षण मिळेल, असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे. नाशिकमध्ये मीडियाशी संवाद साधताना जरांगे पाटील यांनी थेट मुळावरच घाव घातला आहे.

मनोज जरांगे पाटील यांनी नाशिकच्या अपोलो हॉस्पिटलमध्ये दाखल असेलल्या कार्यकर्त्याची भेट घेतली. विलास गाढे असे या कार्यकर्त्याचे नाव आहे. काही दिवसांपूर्वी नाशिकच्या येवला येथे जरांगे पाटील यांची सभा असताना स्वागताच्या वेळी दुर्घटना होऊन काही कार्यकर्ते जखमी झाले होते.

यावेळी विलास गाढे हे देखील जखमी झाले होते. गाढे यांच्यावर अपोलो हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. मनोज जरांगे पाटील यांनी रात्री 2 वाजता त्यांची भेट घेऊन तब्येतीची विचारपूस केली. जरांगे पाटील यांनी मध्यरात्री येऊन विचारपूस केल्याने विलास भारावून गेला होता. त्याला अश्रू अनावर झाले.

यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी मीडियाशी संवाद साधला. जखमी तरुणाची मी विचारपूस केली. त्याची प्रकृती बरी आहे. लवकरच त्याला डिस्चार्ज होईल. पण सरकार किती दिवस आम्हाला वेदना देणार आणि आमचे बळी घेणार आहे? हे मात्र समजायला तयार नाही.

या आगोदरच आरक्षण दिलं असतं, तर आमच्यावर ही वेळ आली नसती. सरकारने आमच्यावर पूर्वीपासून अन्याय केला. आणखी देखील बळीची अपेक्षा आहे. त्यांनी थांबवलं पाहिजे, नाहीतर महागात पडेल, असा इशारा जरांगे पाटील यांनी दिला.

Leave a Comment