हार्दिक पंड्याला दुखापत, मोठी अपडेट समोर 

भारताचा आघाडीचा अष्टपैलू हार्दिक पंड्या न्यूझीलंडविरुद्ध होणार्‍या पुढील आयसीसी विश्वचषक साखळी सामन्यात खेळू शकणार नाही, असे बीसीसीआयने शुक्रवारी जाहीर केले. बांगला देशविरुद्ध येथे झालेल्या लढतीत पंड्याला घोट्याची दुखापत झाली होती.

भारत-न्यूझीलंड यांच्यातील पुढील साखळी लढत रविवारी धर्मशाळा येथे होत आहे. हार्दिक पंड्या आता संघासमवेत धर्मशाळा येथे जाणार नाही. सध्या त्याला विश्रांतीचा सल्ला देण्यात आला आहे आणि बीसीसीआयचे वैद्यकीय पथक त्याच्यावर लक्ष ठेवून आहे.

आता लखनौमधील इंग्लंडविरुद्ध लढतीतच तो खेळू शकेल, असे सूत्रानी यावेळी स्पष्ट केले. भारत-इंग्लंड यांच्यातील लढत 29 ऑक्टोबरला खेळवली जाणार आहे.

बांगला देशच्या डावातील नवव्या षटकात व स्वत:च्या पहिल्या षटकातच पंड्याचा घोटा दुखावला होता. आपल्याच गोलंदाजीवर फॉलो थ्रूमध्ये चेंडू अडवण्याच्या प्रयत्नात त्याला ही दुखापत झाली. त्यानंतर त्याची चाचणी घेण्यात आली व त्यापुढे तो खेळूही शकला नव्हता. पंड्यावर आता बंगळूरमधील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत उपचार केले जाणार आहेत.

Leave a Comment