राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाकडून अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघासाठी रोहित पवार व माझे नाव उमेदवारीसाठी सुचवले गेले असले तरी राहुरी विधानसभा लढण्याची माझी वैयक्तिक इच्छा आहे.
मंत्रीपदी काम केल्याचा अनुभव असल्याने अधिक विकासात्मक काम त्यामुळे राहुरी मतदार संघात करता येईल, त्यामुळे मी विधानसभेसाठी इच्छुक आहे, अशी भूमिका आमदार प्राजक्त तनपुरे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत जाहीर केली. मात्र, पक्ष संघटनेचे जे मत व आदेश असेल त्याचा आदर राहणार आहे, असेही त्यांनी आवर्जून सांगितले.
ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचा मुंबईत आढावा घेतला. त्यावेळी झालेल्या चर्चेची माहिती तनपुरे यांनी माध्यमांना दिली.
पारनेरचे आमदार निलेश लंके यांचे नाव सुचवले गेले, परंतु त्यांच्यासह अनेक आजी-माजी आमदारांची अडचण झाली आहे. एकीकडे सत्तेसमवेत राहायचे की शरद पवारांच्या विचारांसमवेत राहायचे, असा संभ्रम त्यांच्यात आहे.
त्यामुळे अशा सर्वांना दसऱ्यापर्यंत मुदत देऊन तोपर्यंत त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट करण्याचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगितले आहे, असेही तनपुरे म्हणाले.
