छत्रपती संभाजीनगर : अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्यातून सोडण्यात आलेलं पाणी जायकवाडी धरणात (Jayakwadi Dam) दाखल होण्यास सुरवात झाली असून, रात्री उशिरा जायकवाडी धरणाच्या बॅकवॉटरमध्ये पाणी दाखल झाले आहे.
अहमदनगरच्या निळवंडे धरणातून (Nilwande Dam) सोडलेले पाणी जायकवाडीत दाखल होण्यास सुरवात झाली असल्याची माहिती धरण प्रशासनाकडून देण्यात आली आहे. तर, जायकवाडी धरणात पाणी दाखल होण्यास सुरवात झाल्याने मराठवाड्याला मोठा दिलासा मिळाला आहे. तर, दुसरीकडे नाशिक धरणातून सोडण्यात आलेलं पाणी मात्र जायकवाडीत आज दाखल होणार आहे.
दरम्यान, अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यातून जायकवाडी धरणात पाणी सोडतांना प्रशासनाकडून विशेष तयारी करण्यात आली आहे. त्यामुळे, पाणी सोडण्याची पूर्वतयारी म्हणून नदीकाठावरील डोंगळे (पाइप), मोटर्स काढण्याचे काम हाती घेण्यात आले होते. सोबतच, वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे, पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला आहे.
तसेच, अवैध पाणीउपसा करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे संकेत जिल्हा प्रशासनाने दिले आहेत. त्यामुळे, अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यातून जायकवाडी धरणात सोडण्यात येणारे 8.6 टीएमसी पाण्यापैकी अधिकाधिक पाणी जायकवाडीत पोहचवण्याचा प्रशासनाचा प्रयत्न असल्याचे पाहायला मिळत आहे.
