नागपूर(Nagpur) विभागात चार दिवस गारांसह अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. नागपूर,चंद्रपूर, गडचिरोलीत ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
शेतकऱ्यांसह सर्व नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. भारतीय हवामान विभागाच्या माहितीनुसार नागपूर विभागात उद्यापासून (दि.16) 19 मार्चपर्यंत वादळी वारे, गारपीट तसेच पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. 16 व 17 मार्च रोजी नागपूर, चंद्रपूर व गडचिरोली या तीन जिल्हयात अतिसतर्कतेचा इशारा (ऑरेंज अलर्ट) देण्यात आला आहे.
गारपीट व वादळी पावसामुळे मनुष्य व वित्तहानी टाळण्यासाठी नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी केले आहे.
भारतीय हवामान विभागातर्फे नागपूर विभागातील सर्व जिल्ह्यात सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून नागपूर , चंद्रपूर व गडचिरोली जिल्हयांत गुरुवार, 16 मार्च व शुक्रवार, 17 मार्च रोजी अतिसतर्कतेचा इशारा (ऑरेंज अलर्ट) देण्यात आला आहे. त्यासोबतच 16 ते 19 मार्चपर्यंत संपूर्ण विदर्भात वादळी वारे तसेच गारांसह पावसाचा इशारा (यलो अलर्ट) देण्यात आला आहे. भंडारा व गोंदिया जिल्हयात शुक्रवार 17 मार्च रोजी अतिवृष्टीची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
