महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत मार्च २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. अनेक विद्यार्थ्यांनी शंभर टक्के गुण मिळविले आहेत.
मात्र, पुण्यातील एका विद्यार्थ्याने उत्तीर्ण होण्यासाठी आवश्यक असलेले किमान ३५ गुण सर्वच विषयात मिळविले आहे. ३५ टक्के गुण मिळविणारा विद्यार्थ्याचे नाव प्रथमेश तूपसुंदर असून, तो टिळक रस्त्यावरील न्यू इंग्लिश स्कूलचा विद्यार्थी आहे.
दहावीचा निकाल आज ऑनलाइन जाहीर करण्यात आला. त्यात न्यू इंग्लिश स्कूलचा प्रथमेश तूपसुंदर याला सर्व विषयात 35 गुण मिळाले आहेत. प्रथमेशने मराठी, हिंदी, इंग्रजी, गणित, विज्ञान व तंत्रज्ञान, सामाजिक शास्त्र या सर्व विषयात प्रत्येकी 35 गुण मिळवले आहेत.
३५ टक्के गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या कमी असते. एकीकडे शंभर टक्के गुण घेतलेल्या विद्यार्थ्यांचे कौतुक होत आहे. याउलट ३५ टक्के गुण घेतलेला विद्यार्थीही सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.
