रामटेक : शिक्षण आणि वयाचा तसा फारसा संबंध नसतो. जीवनात राहून गेलेले शिक्षण पूर्ण करुन समाधान प्राप्त करुन घेण्याच्या इच्छेने परीक्षा देणाऱ्या साठ वर्षीय आजीने दहावी परीक्षेत चक्क ६० टक्के गुण प्राप्त केले आहे.
तालुक्यातील कांद्री माईन येथील सुजाता पाटील यांनी वयाच्या ६० व्या वर्षी दहावी परीक्षा दिली आणि घवघवीत यश देखील मिळवले. या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. त्या अंगणवाडी मदतनीस म्हणून काम करतात. त्यांनी हे काम करत असताना दहावी उत्तीर्ण होण्याचा निर्णय घेतला. दररोज शाळेत जाणे शक्य होत नसल्याने १७ नंबरचा फॉर्म भरला.
त्यांनी अभ्यासाला सुरुवात केली. घरातील कामाची जबाबदारी आणि अंगणवाडी सेविका म्हणून असलेली कामे, अशी दुहेरी कसरत करीत दिवसरात्र अभ्यास केला. घरातील मंडळींनी त्यांना चांगले सहकार्य केले. याचेच फलित म्हणून सुजाता पाटील (रा.कांद्री) या आजींना चक्क ६० टक्के गुण मिळविले. यामुळे इतर विद्यार्थ्यांच्या निकालापेक्षा या निकालाची चर्चा जास्त प्रमाणात झाली .
