राज्यात लाडकी बहीण योजनेचे पैसे अनेक महिलांच्या खात्यावर जमा झाले आहेत. हे पैसे काढण्यासाठी बँकांसमोर एकच झुंबड उडाली आहे. तर काही ठिकाणी महिला भावूक पण झाल्या आहेत. सांगली जिल्ह्यातील या लाडक्या बहिणीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मंगळसूत्र मोडत एक अनोखे गिफ्ट दिले आहे. ही महागडी भेट पाहून मुख्यमंत्र्यांना सूखद धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. काय दिले लाडक्या बहिणीने गिफ्ट?
मंगळसूत्र राखीचे गिफ्ट
महिलांसाठी लागू करण्यात आलेल्या माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होऊ लागले, याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सांगलीतल्या एका महिलेने मुख्यमंत्र्यांना थेट आपल्या मंगळसूत्राची राखी बनवुन भेट केली आहे.स्टेला दास सकटे या महिलेने आपल्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र राखीच्या स्वरूपात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेट म्हणून दिली आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयात जमा केली राखी
सांगली जिल्हाधिकारी कार्यालयात हे अर्धे तोळे सोन्याच्या दागिन्याची राखी सुपूर्द केली आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महिलांच्या खात्यावर पैसे जमा होऊ लागले आहेत आणि ही योजना अशाच पद्धतीने सुरू राहावी,अशी मागणी करत मुख्यमंत्र्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ही अनोखी भेट दिल्याचं स्टेला सकटे यांनी सांगितले. मुख्यमंत्र्यांक़डून अजून मोठी अपेक्षा नाही. पण त्यांनी ही योजना आणि इतर योजना सुरु ठेवाव्यात अशी विनंती त्यांनी केली आहे.
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संपूर्ण राज्यांमध्ये चालू केली आहे त्याचा पहिला हप्ता महाराष्ट्रातील काही महिलांना 15 ऑगस्ट रोजी मिळाला आहे त्यामुळे सांगलीच्या स्टेला सकटे या महिलेने आपल्याला मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना अंतर्गत पैसे मिळाल्याने आपले मंगळसूत्र मोडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना त्यांचे आभार मानण्यासाठी राखी पाठवली आहे. सदर राखी सांगली जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत त्यांनी पाठवली.
