संगमनेर तालुक्यातील साकूर ते बिरेवाडी फाटा या जिल्हा परिषद अंतर्गत १ किमी रस्त्याच्या डागडुजीसाठी काही महिन्यांपूर्वी निधी मंजूर होऊनही ठेकेदाराच्या दिरंगाईमुळे काम प्रलंबित पडले होते. तसेच संबंधित ठेकेदाराला याविषयी कुठलेही गांभिर्य नसून दोन महिन्यांपूर्वी रस्त्याच्या साईट पट्ट्या बुजवण्यासाठी मुरूम टाकून काम सुरू केल्याचा दिखावा केला होता.
पण प्रत्यक्षात कामाला मुहूर्त मिळेना असे वृत्त DSNews24 ने २० मार्च रोजी ऑनलाईन प्रसिद्ध करताच अखेर रविवार दि. २६ मार्च रोजी ठेकेदाराने खडी टाकून कामाला सुरुवात केली आहे. उशीरा का होईना पण कामाला मुहूर्त मिळाल्याने ग्रामस्थांसह नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
साकूर ते बिरेवाडी फाटा हा मार्ग जिल्हा परिषद अंतर्गत असून दळणवळणच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा मार्ग आहे. तसेच या मार्गावरून वाहतूकही मोठ्या प्रमाणात होत असते. मात्र, अनेक वर्षांपासून या रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाली आहे. अनेकदा वारंवार मागणी करूनही या रस्त्याकडे कायमच दुर्लक्ष केले जात आहे. रस्ताच खड्ड्यांच्या विळख्यात सापडला आहे. तसेच रस्त्याच्या साईट पट्ट्यांची तर भयंकर दयनीय अवस्था झाली आहे. रस्त्याची बऱ्याच वेळा डागडुजी करण्यात आली परंतु ठेकेदाराने निकृष्ट दर्जाचे काम केल्यामुळेच रस्त्याची पुन्हा जैसे तीच परिस्थिती निर्माण झाली आहे.
दरम्यान, १ किमी रस्त्याच्या डागडुजीसाठी काही दिवसांपूर्वी पुन्हा निधी मंजूर झाला. या रस्त्याचे काम एका ठेकेदाराने घेतले आहे. त्या ठेकेदाराने दोन महिन्यांपूर्वी मुरूम टाकून साईट पट्ट्या बुजवून कामाला सुरुवात केली होती. परंतु या ठेकेदाराने कामात दिरंगाई करत अद्यापही काम चालू केले नव्हते. त्यामुळे मुरूमाने बुजविलेल्या साईट पट्ट्या देखील उखडून चालल्या होत्या.
याकडे अधिकाऱ्यांचेही दुर्लक्ष होत आहे. ठेकेदाराच्या निकृष्ट दर्जाच्या कामामुळेच साकूर – बिरेवाडी रस्त्याची दुरवस्था झाली असल्याचे काही नागरिकांनी सांगितले. परंतु प्रलंबित पडलेल्या रस्त्याच्या कामाला उशीरा का होईना मुहूर्त मिळाला असून सद्यस्थितीत चालू केलेल्या कामाचा दर्जा ठेकेदाराने उत्कृष्ट ठेवला तरच रस्ता दणकट होईल. तसेच आता ठेकेदाराने लवकरात लवकर काम पुर्ण करावे अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
