मुंबई : विधान परिषद निवडणुकीत क्रॉस व्होटिंग केल्याचा ठपका ठेवत काँग्रेस आमदार सुलभा खोडके यांचे पक्षातून निलंबन करण्यात आले आहे. पक्ष विरोधी कारवाया केल्याने काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्या निर्देशावरून प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सुलभा खोडके यांच्यावर कारवाई केली. सुलभा खोडके राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची कुणकुण लागताच पक्षाने त्यांच्यावर कारवाई केली आहे.
काँग्रेस आमदार सुलभा खोडके यांनी अमरावती विधानसभा मतदारसंघातून भाजपच्या सुनील देशमुख यांना हरवून विधानसभेत प्रवेश केला होता. महाविकास आघाडी सत्तेत असताना त्यांनी सरकारच्या माध्यमातून मतदारसंघातील कामे करवून घेतली. तसेच महायुती सरकार सत्तेत आल्यानंतर आणि विशेषत: अजित पवार यांची महायुतीत एन्ट्री झाल्यानंतर सुलभा खोडके यांनी पुन्हा मतदारसंघासाठी निधी खेचून आणायला सुरूवात केली. राष्ट्रवादीसोबत सलगी झाल्यानंतर विधान परिषद निवडणुकीत त्यांनी काँग्रेस उमेदवाराला मतदान केले नाही, असा त्यांच्यावर आरोप आहे.
सुलभा खोडके यांच्यासह ५ आमदारांनी विधान परिषद निवडणुकीत पक्षविरोधी कारवाया केल्याने त्यांच्यावर कारवाई होणार असल्याचे पक्षनेतृत्वाने सांगितले होते. अखेर चार महिन्यानंतर त्यातली पहिली कारवाई काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्या निर्देशावरून प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली. सुलभा खोडके यांना सहा वर्षांसाठी पक्षातून निलंबित करण्यात आले आहे.
