राज्यात सध्या निवडणुकीची धामधूम सुरू आहे. विधानसभा सार्वत्रिक निवडणूक आचारसंहिता लागू झाल्यापासून पोलिसांची करडी नजर आहे. नगरमध्ये पोलिसांनी तब्बल दोन कोटी रुपयांची दारु जप्त केली आहे.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नगरच्या स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी दोन कोटी रूपयांची दारू पकडली आहे. त्यामुळे राज्यात चर्चा सुरु झाल्या आहेत.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अहिल्यानगरच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीसांनी २ कोटी २ लाख रुपयांची विदेशी दारू जप्त केली आहे. गोवा राज्यातील मडगाव येथून इंदौर, मध्य प्रदेशला विदेशी दारू घेऊन जात असल्याची गुप्त माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना मिळाली होती. त्या आधारे बायपास रोडवरील अरणगाव शिवारात सापळा लावून हा ट्रक ताब्यात घेतला आहे. याप्रकरणी दीपक पाटील, शहाजी पवार, शैलेश जाधव या तीन जणांवर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून अटक केली आहे. या आरोपींची कसून चौकशी करून या विदेशी दारूचे मध्यप्रदेश कनेक्शनच्या मुळाशी जाणार असल्याचं पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी सांगितले.
राज्यात विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 चा कार्यक्रम जाहीर झाल्यापासून निकाल घोषित होईपर्यंतच्या कालावधीत आचारसंहिता लागू असेल. या कालावधीत राज्यात अवैध दारुची निर्मिती, वाहतूक तसेच विक्री होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे अवैध मद्यावर राज्य उत्पादन शुल्क, आणि पोलिसांची करडी नजर आहे. कठोर कारवाई करण्याकरिता पथके नेमण्यात आली आहेत. परराज्यातील मद्याची अवैध वाहतूक रोखणे, रात्रीची गस्त, संशयित वाहनांची तपासणी तसेच अवैध दारु धंद्याना प्रतिबंध करण्याच्या सूचना सर्व पथकांना देण्यात आल्या. त्यानुसार पथकांकडून अवैध मद्यावर सातत्याने कारवाई करण्यात येत आहे.
