शिव्या द्याल तर पडणार महागात, नगर जिल्ह्यातील “या” ग्रामपंचायतीने घेतला मोठा निर्णय 

अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यामधील सौंदाळा गावाने राज्यात मोठा आदर्श उभा केला आहे. हे गाव नेहमी समाजहिताचे निर्णय घेत असते. यावेळी ग्रामसभेत आई आणि बहिणीच्या नावाने शिव्या देण्यास बंदी घालण्यात आली आहे. जो शिव्या देईल त्याच्यावर ग्रामपंचायतीकडून दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचा ठराव ग्रामसभेत मंजूर झाल्याची माहिती लोकनियुक्त सरपंच शरद आरगडे यांनी दिली आहे.

 

500 रुपये दंड

सौंदाळेत झालेल्या ग्रामसभेत गावातील महिला आणि पुरुषांनी गावामध्ये यापुढे शिव्या द्यायच्या नाहीत. जर शिव्या दिल्या तर पाचशे रुपये दंड सक्तीने आकारण्यात येईल. शिव्या देताना आईचा आणि बहिणीचा कुठलाही दोष नसताना त्यांच्या शाररिक अवयवा संदर्भात शिवीगाळ करायची नाही, असा दंडक केला आहे. त्याचे उल्लंघन केल्यास आता दंड वसूल करण्यात येणार आहे.

अर्वाच्य शब्द वापरून स्त्री देहाचा अपमान केला जातो. त्यामुळे शिव्या देणाऱ्या व्यक्तीने शिव्या देताना आपल्या आई बहिणींना मुलींना आठवलं पाहिजे. त्यामुळे ग्रामपंचायतीने शिव्या देण्यासाठी बंदी घालून , महिला भगिनींचा सन्मान करण्यात येणार असल्याचं सरपंचांनी सांगितलं आहे.. माझ्या पंधरा वर्षाच्या कालावधीत या निर्णयासह अनेक निर्णयात्मक ठराव ग्रामसभेत मंजूर करण्यात आले असल्याची माहिती लोकनियुक्त सरपंच शरद अरगडे यांनी दिली आहे..

Leave a Comment