नगर – कल्याण महामार्गावर पिकअप व टँकरचा भीषण अपघात, २ महिला ठार

आळेफाटा – नगर-कल्याण राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात झाल्याची बातमी समोर आलीय. ओतूरजवळील डुंबरवाडी येथे पिकअप व दूध टँकरची समोरासमोर जोरदार धडक होऊन भीषण अपघात झाला आहे. हा भीषण अपघात मंगळवार, दि. 30 डिसेंबर रोजी सकाळी झालेल्या या अपघातात पिकअपमधील वंदना गणेश हिल्लम (वय २०) रा. खुट्टल ता. मुरबाड जि. ठाणे व मंदा शिवराम हिल्लम (वय ३५), रा. तळेगाव, ता. मुरबाड, जि. ठाणे यांचा मृत्यू झाला. तसेच अंदाजे १५ ते २० जण जखमी झाल्याची माहिती समोर आलीय.

अपघातानंतर काही काळ महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. घटनेची माहिती मिळताच ओतूर पोलीस घटनास्थळी दाखल झाले व वाहतूक सुरळीत केली. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक लहू थाटे यांच्या मार्गदर्शनाखाली ओतूर पोलीस करीत आहेत.

अधिक माहिती अशी की, आळेफाटाच्या दिशेने शेतमजूर घेऊन जाणारी पिकअप गाडी व कल्याणच्या दिशेने येणारा दूध टँकर यांची डुंबरवाडी येथील अभिजीत हॉटेल जवळ समोरासमोर धडक झाली. या धडकेत पिकअपचा चालक व त्यातील शेतमजूर मोठ्या प्रमाणात जखमी झाले. दूध टँकर चालकालाही गंभीर दुखापत झाली आहे.

अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तत्काळ मदतकार्य करत जखमींना ओतूर प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. त्यानंतर काही जखमींना आळेफाटा येथील खासगी रुग्णालयात तसेच मंचर येथील आरोग्य केंद्रात पुढील उपचारासाठी हलविण्यात आले. तर ओतूर, बगाडवाडी, अकोले, पाचघर, निमगिरी, लहाळी, टोकवडा, फोफसंडी, मांडवे, बल्लाळवाडी येथील महिला पुरुषांनी प्राथमिक केंद्रात प्राथमिक उपचार घेतले.

Leave a Comment