मुंबई – लग्न समारंभासाठी मुहूर्त पाहिला जातो. शुभ मुहूर्ताच्या तारखेनंतरच लग्न निश्चित ठरविले जाते. लग्नाचा सिझन जोरात सुरू असताना अधिक महिन्याची एंट्री होणार आहे. 17 मे पासून पुढील आठ महिने शुभमुहूर्ताच्या तारखा नाहीत. शुभ मुहूर्त उपलब्ध नसल्याने ज्यांच्या घरात लग्नाची बोलणी सुरू आहेत, अशा लग्नाळुची अडचण होणार आहे. तसेच लग्नासाठी शुभमुहूर्तासाठी 2027 ची वाट पाहवी लागणार आहे.
यंदा 17 मे ते 15 जून या काळात अधिक मास आहे. हिंदू धर्मशास्त्रानुसार या काळात कोणतेही शुभ कार्य केले जात नाही. त्यानंतर लगेच जुलैपासून गुरू आणि शुक्र ग्रहांचा अस्त होणार असून चातुर्मासाची सुरुवात होईल. या काळात मंगल कार्ये वर्ज्य मानली जातात. तसेच ऑक्टोबरपासून सिंहस्थ कुंभमेळ्याचे आयोजन होत असल्याने त्याचाही परिणाम विवाह मुहूर्तावर होणार आहे. यामुळे विवाहासाठी मुहूर्ताचा मोठा तुटवडा भासणार आहे. त्यामुळे विवाह इच्छुकांचा कोंडमारा होणार आहे. अधिक मास असल्याने शुभकार्ये बंद, जुलैपासून गुरू-शुक्राचा अस्त आणि चातुर्मास प्रारंभ, ऑक्टोबरमध्ये सिंहस्थ कुंभमेळ्यामुळे मुहूर्ताची अडचण, पुढील मुहूर्त थेट जानेवारी 2027 मध्ये.
