अहमदनगर (DSNews24) कोपरगाव तालुक्यातील धामोरी येथील शेतकरी गंगाधर वाळीबा ठाकरे यांच्यावर मंगळवारी रात्री बिबट्यांने हल्ला केला. त्यात ठाकरे गंभीर जखमी झाले आहे. धामोरी शिवारात उत्तरेकडील 2 कि.मी अंतरावर गंगाधर ठाकरे हे कुटुंबासह राहतात.
मंगळवारी रात्री 2:40 च्या दरम्यान गोठ्यातील गायीवर व नंतर कुत्र्यावर बिबट्या हल्ला करत असतांना ठाकरे यांनी गायीस व कुत्र्याला वाचविण्याचा प्रयत्न केला. परंतु बिबट्याने गाय व कुत्र्याला सोडून ठाकरे यांच्यावर हल्ला चढविला. त्यात ते गंभीर जखमी झाले. त्यांनी आरडा ओरड केल्यानंतर घरातुन पत्नी व नातु ज्ञानेश्वर यांनी धाव घेतली.
नातवाने बटरी चमकविल्यामुळे प्रकाश झोताने बिबट्याने त्यांना सोडले व बिबट्या शेतात पळुन गेला. घटना समजताच शेजारील शेतकरी सुनिल वाणी यांनी त्यांना चासनळी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात प्राथमिक उपचार करुन पुढिल उपचारासाठी कोपरगाव ग्रामीण रूग्णालयात दाखल केले. त्यांच्या डोक्याला, हातावर बिबट्याने जोरदार हल्ला केल्यामुळे जखमा खोल असुन बिबट्याने सात ते आठ ठिकाणी चावे घेतल्याने त्यांना 52 टाके पडले आहे
