जालना जिल्ह्यातील अंतरवली सराटी गावात मराठा आंदोलकांवर झालेल्या अमानुष लाठीहल्लानंतर राज्यभरात या घटनेचे पडसाद पडू लागले आहेत. तर या घटनेनंतर राज्यातील राजकारणं देखील चांगलंच तापलेले दिसून येत आहे. शरद पवार, उद्धव ठाकरे, आमदार रोहित पवार, संभाजीराजे, उदयनराजेंसह विविध पक्षाच्या नेत्यानी या गावाला भेट देऊन आंदोलकांची भेट घेतली.
दरम्यान, ही घटना कशी घडली, पोलिसांनी बळाचा वापर का केला. याबाबत औरंगाबाद परिक्षेत्राचे पोलिस महानिरीक्षक यांनी खुलासा केला आहे. तर आता परिस्थिती संपूर्णपणे नियंत्रणात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ते टीव्ही9 या वृत्तवाहिणीशी बोलत होते.
पोलिस महानिरीक्षक डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण म्हणाले, मंगळवारपासून मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सुरू केले. त्यांची प्रकृती खालावत होती. तसा डॉक्टरांनी आम्हाला अहवाल दिला. त्यानुसार, त्यांच्या आरोग्याच्या दृष्टिकोणातून त्यांना रुग्णालयात घेऊन जाण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
त्यासाठी ते तयारही झाले होते. पण, काही जनसमुदायाचा विरोध होता. त्यामुळे जनसमुदायाने महिला पोलिस कर्मचाऱ्यांवर दगडफेक केली. एसआरपीचे जवान जखमी झाले. हिंसक जमावाला पांगवण्यासाठी उपस्थित असलेल्या अधिकाऱ्यांनी बळाचा वापर करून जमाव पांगवला, असा खुलासा चव्हाण यांनी केला.
आरोपींविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले. अंबड या ठिकाणी पोलिसांवर दगडफेक करण्यात आली. 40 आरोपींना अटक केली. एसआरपीच्या तीन कंपन्या मिळाल्या आहेत. बाजूच्या ठाण्यातून फोर्स उपलब्ध करून देण्यात आली आहे. पेट्रोलिंग सुरू करण्यात आली आहे. आता परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आलेली आहे.
नागरिकांनी कुठल्याही प्रक्षोभक भाषणाला बळी पडू नये. कायदा आपल्या हाती घेऊ नये. शांततेचं वातावरण राहण्यासाठी पोलिसांना सहकार्य करावे. महिला पोलिसांवर दगडफेक करण्यात आली. दोन पोलिसांना आयसीयूमध्ये भरती करावे लागले. सात जणांचे सीटीस्कॅन करावे लागले. हे वास्तव असल्याचे पोलिस महानिरीक्षक डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण यांनी स्पष्ट केले.
64 पोलीस कर्मचारी जखमी
जमाव आक्रमक झाल्यानंतर आम्ही जमावाला शांततेचं आवाहन केलं होतं. आंदोलकांनी प्रतिसाद न दिल्यामुळे बळाचा वापर करावा लागला. हिंसक आरोपींना ताब्यात घेतले आहे. २१ महिला पोलीस आणि ४३ पुरुष पोलीस असे 64 पोलिस कर्मचारी जालना सिव्हील रुग्णालयात उपचार घेत आहेत, अशी माहिती पोलीस महानिरीक्षकांनी दिली.
